ऊसतोड मुकादमाची गळफास घेऊन आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा – ऊसतोडणी कामगार मुकादमाने आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिरसदेवी तांडा परिसरात घडली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.नामदेव हरसिंग राठोड (वय 48 वर्षे) हे गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगार मुकादम म्हणून काम पाहत होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सिरसदेवी तांडा परिसरातील हॉटेल मयूरच्या पाठिमागील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. या बाबतची माहिती पोलिस प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांचा मृतदेह जातेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. राठोड यांनी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.