उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी ‘बाजरी’

उन्हाळा म्हटलं कि, सगळीकडे भकास व सुकलेलं दृश्य पाहायला मिळतं. हिरवं पाहणं तर लांबच त्यात महाराष्ट्रातील काही भागात पाण्याची कमतरता व वरून रखरखीत उन्हाचा मारा त्यामुळे हिरव्या पिकांचा प्रश्नच येत नाही. सोबतच हिरवा चारा तर फारच कमी पाहायला मिळतो.

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत त्यांचा हा मोठा प्रश्न आहे पण काळजी करू नका अशा परिस्थितीत बाजरी हे कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. बाजरी हे एकदल वर्गातील हिरवा चारा देणारे उत्तम पीक आहे. बायफ या संस्थेने उन्हाळी हंगामातील हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी बाजरीची ‘बायफ बाजरी-1’ ही जात विकसित केली आहे.

‘बायफ बाजरी-1’ जातीचे वैशिष्ट्ये :

  •  ही जात जोमाने वाढणारी असून, तिच्या 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत तीन कापण्या मिळतात.
  •  या जातीला भरपूर फुटवे येत असल्याने चाऱ्याचे अधिक उत्पादन मिळते.
  • बाजरीची ही जात पालेदार, रसाळ, गोड, लव विरहीत, मऊ असून, उंच वाढते.
  •  फेब्रुवारीमध्ये पेरणी केल्यानंतर ही बाजरी जात ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाण्यावर येते. अधिक उत्पादन मिळते.
  •  या बाजरीचा हिरवा चारा तसेच वाळलेला चाराही पौष्टीक असतो. मुरघासही (सायलेज) चांगला तयार होतो.
  •  दोन कापण्यांपासून हिरवा चारा आणि तिसऱ्या कापणीपासून धान्य आणि वाळलेला चाराही मिळतो. धान्य देखील खाण्यास उत्तम आहे.

जमीन व पूर्वमशागत : बायफ बाजरी -1 या जातीसाठी मध्यम ते भारी, निचरा होणारी जमीन योग्य आहे. कारण या जमिनीत तिची वाढ वेगाने होते. पेरणीपूर्वी एक नांगरट करून गरज वाटल्यास कुळवाच्या एक दोन पाळ्या देऊन जमीन तयार करावी.

पाणी व्यवस्थापन : बाजरीची पेरणी केल्यानंतर व बाजरी उगवून आल्यानंतर दोन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यापुढील पाण्याच्या पाळ्या उन्हाळी हंगामामध्ये भारी जमिनीत बारा ते पंधरा दिवसांनी आणि मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी द्याव्यात.

फोन नं. ०२०-२६९२६२४८/२६९२६४४८.
(बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे.)