सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा काहीही अधिकार नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

टीम महाराष्ट्र देशा– सासू-सासऱ्यांच्या स्थावर आणि जंगम दोन्ही प्रकारच्या मालमत्तांवर सुनेचा काहीही अधिकार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे.जनसत्ताने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

नेमकं प्रकरण काय होतं ?
एका महिलेने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ती सासु-सासऱ्यांकडे देखभाल खर्च मागत नसल्याने तिला त्यांच्या घरात राहू दिलं जावं, अशी मागणी करणारी ती याचिका होती. महिलेने यापूर्वी तिच्या नवऱ्यावर आणि सासु-सासऱ्यांवर हुंड्यासाठी छळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महिलेने घटस्फोटासाठीही अर्ज केला होता. महिलेच्या सासऱ्यांनीही जिल्हा न्यायालयासमोर अर्ज करून तिच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. सासऱ्यांनी केलेल्या आरोपांनंतर जिल्हा न्यायालयाने महिलेला ताबडतोब घरातून बाहेर पडण्यास सांगितलं होतं. त्याविरोधात महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय म्हटलं ?
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती वी. कामेश्वर राव यांच्या पीठाने महिलेची याचिका फेटाळून लावली. सासू-सासऱ्यांच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेवर सुनेचा काहीही अधिकार नाही, असा निर्णय त्यांनी दिला. सासू-सासऱ्यांची मालमत्ता पैतृक असेल किंवा स्वकमाईची, त्याने त्यांच्या मालकी हक्कात काहीही बाधा येत नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालकीच्या घरात शांततापूर्ण जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचं नमूद करत त्यांनी कायदेशीर वारसालाही घरातून बाहेर जाण्यास सांगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.