बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – एस. के. माळी

टीम महाराष्ट्र देशा -अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन  सांगली जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एस. के. माळी यांनी केले आहे.श्री. माळी म्हणाले, आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील (ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाचे कुठलेही महामंडळ अस्तित्वात नाही) लाभार्थींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही संधी दिली जाणार असून ज्यांना स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरू करावयाचा आहे, त्यांना या योजेंतर्गत पाच लाख रूपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवाराचा सहभाग 5 टक्के आहे. तर उर्वरित 35 टक्के रक्कम 4 टक्के व्याजदराने महामंडळाकडून बीज भांडवल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जाची परतफेड पाच वर्षात करावयाची असते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.in किंवा www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली यांच्याशी 0233-2600554 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.