शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी संघटना

पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

तालुक्यातील शेतकरी दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. यातच जून महिन्यात पाऊस झाला नसल्यामुळे काही भागांत पेरण्या झाल्या नाहीत. ज्या भागात पेरणी होऊन सोयाबीन काढण्याची वेळ आली होती, तेथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, तूर, टोमॅटो, भाजीपाला व फळबागेला पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

प्रशासनाकडून मात्र पंचनामे करून वेळकाढूपणा केला जात आहे. तसेच पीकविम्याची रक्कम बॅंकेत भरली असून त्याच्या नोंदी विमा कंपनीकडे असतानाही नुकसान झाल्याबाबत अर्ज मागवून घेतले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना तास – तास रांगेत थांबावे लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांना अर्ज भरावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीकविम्यासाठीच्या जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात यावी.

आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर सर्व मालाची खरेदी सुरू करावी, रब्बीसाठी बियाणे व खत मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावर तालुकाध्यक्ष गोविंद बस्तापुरे, संतोष भेटे, रमाकांत मोरे, मारोती देवकत्ते, नागनाथ होनराव, ज्ञानोबा हेळंबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

गरजू शेतकऱ्यांचा आधार : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

महापुरामुळे सांगलीत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ; बाजारपेठ उध्वस्त

शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार – चंद्रशेखर बावनकुळे