किटकनाशक विषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

मुंबई : पिकांवर फवारणी करणा-या किटकनाशकातून विषबाधा झाल्याने यवतमाळसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांपासून फवारणी दरम्यान होत असलेल्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती स्थानिक प्रशासनाकडून मंत्रालयात कळवण्यात आली नव्हती, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मध्यंतरी माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली. या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील, या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असे वरिष्ठ अधिका-यांकडून सांगितले जात आहे.