‘मनरेगा’त अधिकाधिक कामांसाठी तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन करावे

यशोमती ठाकूर

अमरावती – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी  तालुकानिहाय सूक्ष्म नियोजन व लेबर बजेट तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

मनरेगामधील कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक काल झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध तालुक्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गावपातळीवरील कामाची गरज, त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करावे. रोजगार उपलब्ध करून देताना त्यातून शाश्वत व उत्पादक स्वरूपाची मत्ता निर्माण करणे देखील अपेक्षित आहे. या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना नियोजन व लेबर बजेट तयार करण्यास अनन्यसाधारण महत्त्व देणे अपेक्षित आहे. त्यानुसार सूक्ष्म नियोजन करावे.

गावपातळीवरील किती मजुरांना कामाची आवश्यकता आहे, किती दिवस कामाची आवश्यकता आहे व अशा मजुरांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देताना त्यातून कोणत्या मत्ता निर्माण करता येतील या बाबीचे सूक्ष्म नियोजन करणे आता शासनाकडून अनिवार्य  करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक तालुका अधिकाऱ्यांनी गावनिहाय कामाची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मनरेगा कामांत जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर

अमरावती जिल्हा मनरेगाच्या कामांमध्ये यंदा कोरोना संकटकाळात लॉकडाऊन व इतर विविध कारणांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली कामाची गरज लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यात प्राधान्याने जलसंधारण, रस्तेविकास आदी विविध विकासकामे राबविण्यात आली. या कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात सुरुवातीपासून आघाडीवर राहिला आहे. यापुढेही मनरेगातून स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगारनिर्मिती करत विकासकामांना चालना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

मनरेगा कामांमध्ये जलसंधारणाच्या कामांसह ग्रामविकासाच्या विविध कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
कंपार्टमेंट बंडींग, चेक डॅम, कंटूर बंडींग, गॅबीयन बंधारे, भूमिगत बंधारे, शेततळे, वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, सामूहिक विहिरी, रेशीम लागवड, फळबाग लागवड, नर्सरी, कंपोस्ट पीट, व्हर्मी कंपोस्ट, नाडेप, जनावरांचे गोठे, वृक्ष लागवड, सामूहिक वृक्ष लागवड, वैयक्तिक वृक्ष लागवड प्रामुख्याने महोगनी वृक्ष लागवड, बारमाही रस्ते, पेव्हर ब्लॉक, क्राँकीट रोड, बाजार तळ, खेळाची मैदाने तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, धान्य गोदाम, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, छोटे पाझर तलाव, स्मशानभूमी शेड, छोटे पूल, शौचालयाचे बांधकाम, शाळेसाठी कंपाऊंड वॉल, छतावरील पाण्याचे पुनर्भरण, इमारत दुरुस्ती कामे असे करताना पुरेशा प्रमाणात कामे सुचवणे जेणेकरून या कामाचा समावेश वार्षिक कृती आराखड्यात तसेच लेबर बजेटमध्ये करता येऊ शकेल व कामे कार्यान्वित करताना पुढे तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही. यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –