शेतकऱ्याला समृद्ध करण्याची क्षमता ही फलोत्पादनात आहे – शरद पवार

शरद पवार

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या तीनदिवसीय अधिवेशनास बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे शनिवारी (ता. ३) प्रारंभ झाला. या वेळी अध्यक्षपदी श्री. पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘एके काळी देशात अन्नधान्याची खूप प्रमाणात टंचाई होती. शेतकऱ्यांनीच अन्नधान्याची पूर्तता केली. जगालाही आपण अन्नधान्य निर्यात करीत आहोत. मात्र शेतकऱ्यांची गरज भागविण्यासाठी आता फळशेतीला गती द्यावी लागेल. कारण शेतकऱ्याला समृद्ध करण्याची क्षमता ही फक्त फलोत्पादनात आहे.’’ शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नातून आंबा, संत्रा, डाळिंब, केळीसाठी तसेच इतर फळपिकांसाठी अशा अनेक संस्था स्थापन केल्या.

“अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी देशाला कष्टपूर्वक साथ दिली. मात्र आता शेतकरी वर्गाची गरज भागविण्यासाठी फळशेतीला प्रोत्साहन आणि गती देण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

श्री. पवार यांनी बागाईतदार संघाची स्थापनेविषयक आठवणींना उजाळा दिला. “१९६० मध्ये संघाच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्या नानासाहेब शेंबेकर यांच्या पहिल्या बैठकीला मी प्रेक्षक म्हणून गेलो होतो. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांत संघाचे एकही अधिवेशन मी चुकविलेले नाही. संघात आता नवी पिढी आली आहे. राजेंद्र पवार यांनी संघाचे काम हाती घेतल्याचा आनंद आहे. ते एक वेगळी दिशा संघाला देतील. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी संघात वैविध्यपूर्ण कामे करणारी पिढी पाहून समाधान वाटते,” असे श्री. पवार म्हणाले.

तसेच “ऊस व साखर उत्पादनात महाराष्ट्र दोन नंबरवर आहे. मात्र, साखरेच्या मार्केटिंगसाठी राज्याला अडचणी येतात. पण वाढत्या उत्पादनासाठी विदेशी बाजारात उतरल्याशिवाय पर्याय नाही. संघ त्यासाठी प्रयत्न करतोय ही आनंदाची बाब आहे. द्राक्ष निर्यात आता सव्वादोन लाख टनांच्या पुढे गेली आहे. या निर्यातीत राज्याचा वाटा त्यात ९८ टक्के आहे. शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारून कष्ट व धडपड केल्यामुळे हा बदल झाला आहे. मात्र चीन, आग्नेय आशियाच्या बाजारपेठा शोधाव्या लागतील,” असे श्री. पवार म्हणाले.

संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले, की नवे तंत्रज्ञान, वाण, सल्ला देणारा संघ विविध समस्या सोडविण्याचे ताकदवान व्यासपीठ बनले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना महाग्रेपची स्थापना झाल्याने शेतकरी निर्यातक्षम बनले. मात्र भविष्यात संघ चालविण्यासाठी निधी उभारावा लागेल. जीए आयात व द्राक्ष लागवडीशी संबंधित उत्पादनाबाबत नोंदणीच्या समस्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने सोडवाव्यात.

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी पवारांचे खूप कौतुक केले. ते म्हणाले, श्री. पवार यांची द्राक्ष बागाईतदार संघाच्या अधिवेशनातील उपस्थिती प्रोत्साहन देणारी असते. श्री.पवार यांच्याकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभार मानतो. या अधिवेशनातील त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेऊन आम्ही जाऊ. त्यानुसार देशाच्या कृषी व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करू.

“शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्याचे सध्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र अवघड नाही. त्यासाठी ‘आयसीएआर’ने प्रत्येक जिल्ह्यात दोन गावे निवडून प्रयोग सुरू केले आहेत. जलवायू परिवर्तन, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनाबरोरच तर आता संपूर्ण शेतीच एकात्मिक पद्धतीने करावी लागेल. त्याला प्रक्रिया व बाजारपेठीची जोड द्यावी लागेल.”

युवा शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगात आणून रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये २५ केंद्रे तयार केली गेली आहेत. जल वायू परिवर्तनात तगून राहणारी शेती साकारण्यासाठी १५१ समूह तयार करू, असेही डॉ. महापात्रा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

रोहित पवार यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला

अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघरसाठी अतिरिक्त सहा पथकांची एनडीआरएफकडे मागणी – मुख्यमंत्री
Loading…