आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले, शेतकऱ्यांनी केला दिल्ली जयपूर हायवे बंद

दिल्ली जयपूर हायवे

नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा निघू शकतो, अशी शक्यता आज वर्तवली आहे. मात्र, 18 दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले आहे.

आंदोलकांनी आपला मोर्चा आता दुसऱ्या ठिकाणांवर केंद्रीत केला असून राजस्थानातल्या शाहजहांपूर इथं हरियाणा सीमेजवळ शेतकऱ्यांनी हायवे बंद केला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून सरकार त्यासाठी तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पंजाब सीमेवर आधीच त्यांनी एक महामार्ग रोखून धरला आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र कोंडी फुटली नाही. दरम्यान शहा यांनी पंजाबमधल्या भाजपच्या नेत्यांची आंदोलन आणि राज्यातल्या परिस्थितीबाबत आज चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या –