भाजपा सरकारला देशातील शेतकरी हा मोठा शत्रू वाटत आहे – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

सांगली- केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसचा विरोध असून याविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. कोल्हापूरच्या भव्य ट्रॅक्टर रॅलीनंतर आज सांगलीत ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. केंद्रातील भाजपा सरकारचे कृषी धोरण हे शेतकरी हिताचे नसून भाजपा सरकार शेतकऱ्यांना पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू मानत आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसने काल सांगली येथे ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. या रॅलीत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कृषिराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आ. विक्रम सावंत, विशाल पाटील, जयश्री पाटील,आ. मोहन जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांगलीच्या एसटी स्टँड परिसरातून ही रॅली सुरू होऊन नेमीनाथ नगर येथे समारोप करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने या कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे होती पण नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत ‘हम करे सो कायदा’ अशी आहे. निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत. मोदींचा हट्टीपणा सुरू आहे. तोच हट्टीपणा शेतीच्या कायद्याबाबत मोदी सरकारने केला. हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत तर उद्योगपतींच्या हिताचे आहेत.

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले की, केंद्र सरकारने हे कायदे करताना कोणतीही चर्चा केली नाही, हुकुमशाही पद्धतीने हे कायदे मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान करणारा हा कायदा आहे. उद्योगपतींच्या स्वार्थापोटी हे कायदे संमत केले आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्याविरोधात उठाव केला आहे. या कायद्यामुळे मार्केट कमिट्या उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधात सर्वांनी एकजुट दाखवावी, असे आवाहन त्यांनी यांनी केले.

जवळपास हजार ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाले होते.यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भाजपाला शेतकऱ्यांना नाहक त्रास द्यायचा आहे म्हणूनच परदेशातून शेतीमाल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानातून देखील कांदा आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानपेक्षा भाजपा सरकारला देशातील शेतकरी हा मोठा शत्रू वाटत आहे. आज शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यातबंदी करण्यात आली, पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारचे धोरणेच शेतकऱ्यांना मारक आहेत. दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक असताना या केंद्र सरकारने दूध पावडर आयात केली त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला. आता कृषी विरोधी कायदे आणले त्याने देशभरातील शेतकरी उद्धवस्थ होणार आहे. त्यामुळेच शेतकरी हितासाठी काँग्रेसने हे आंदोलन छेडले आहे.

महत्वाच्या बातम्या –