केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत त्याच्याविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

मुंबई – केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत त्याच्याविरोधात आम्ही सत्याग्रह करत आहोत. सेवाग्राम प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. बापूंनी न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि साठेबाजांच्या हिताचे आहेत. शेतकरी, कामगार यांना चिरडून टाकण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्याला आमचा विरोध आहे असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्याविरोधातील लढा तीव्र करत काँग्रेसने काल राज्यभर सत्याग्रह आंदोलन केले.माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काल राज्यभर किसान अधिकार दिन पाळत सत्याग्रह आंदोलन केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना थोरात यांनी सरकारवर टीका केली.

थोरात म्हणाले,  हा लढा शेतकऱ्यांसाठी, बहुजनासाठी, गरिब लोकांसाठी आहे.माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीची व्यवस्था निर्माण केली आणि नंतर ती व्यवस्था देशभर पोहचली. ही व्यवस्थाच आता मोडीत काढून शेतकऱ्यांचा आधार काढून घेतला जात आहे. या कायद्यात किमान आधारभूत किंमतीबदद्लची स्पष्ट भूमिका नाही. शेतकऱ्याला दाद मागणेही कठीण आहे. अनेक त्रुटी या कायद्यात आहेत. साठेबाजीला प्रोत्साहन मिळून महागाईचा सामना करावा लागणार आहे. शेतक-यांना उद्धवस्त करणारे हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील असे थोरात म्हणाले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, माजी मंत्री आ. रणजित कांबळे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुआ, बी.एम. संदीप, वामशी चंद रेड्डी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीत जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर सत्याग्रह आंदोलनास सुरुवात झाली.

दरम्यान, मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी हे काळे कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावले जाणार आहेत म्हणूनच त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी उभा आहे. शेतकऱ्यांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा हा संघर्ष आहे. मोदी सरकारचा या कायद्यामागील हेतूच स्वच्छ नाही, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये सत्याग्रह करण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे सत्याग्रह करण्यात आला. यासोबतच राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयीही काँग्रेस नेते, पदाधिकारी यांनी सत्याग्रह करून शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना विरोध व्यक्त केला.शेतकरी विरोधी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –