‘या’ ठिकाणातील विकास कामे ठरतील ग्रामीण भागातील आदर्श

दादाजी भुसे

मालेगाव – बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील विकास कामे ही ग्रामीण भागातील विकास कामांसाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी आदर्शवत ठरतील, असा विश्वास राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.

लखमापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषदेचे सदस्य यतीन पगार, माजी सदस्य प्रशांत बच्छाव, मधुकर देवरे, म.वि.प्र.चे उपसभापतील राघो नाना अहिरे, डॉ.शेषराव पाटील, गजेंद्र पाटील, शशी निकम, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पांडूरंग कोल्हे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामविकास खात्याचा कारभार सांभाळत असताना भूमिपूजन केलेल्या विकासकामांचे लोकार्पण करतांना आनंद होत असल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले, बागलाण तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहू. आजच्या भूमिपूजनासह लोकार्पण करण्यात आलेल्या विकास कामांसोबतच प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे शेत शिवारात पाणी साचले तर काही शेतातील माती सुध्दा वाहून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून लवकरच त्यांना शासनामार्फत मदत दिली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे

निसर्गाच्या कोपामुळे आज शेतकरी अडचणीत असला तरी शासन बळीराजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतशिवाराचे पंचनामे कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेतच परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांनी संबंधित विमा कंपनीकडे रितसर अर्ज दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांना सक्षम व समृध्द करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून कर्जमुक्तीच्या घोषणेची अंमलबजावणी करत 19.50 हजार कोटीचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.

कृषी संदर्भातील चांगल्या सूचना व संकल्पना स्वागतार्ह

शेतमालाची साठवणूक, त्यावर होणारी प्रक्रिया व उत्पादीत केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यासाठी स्मार्ट योजना कृषी विभागाकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी गटशेतीसह शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे आवाहन करतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले कृषी संदर्भातील चांगल्या सूचना व संकल्पना स्वागतार्ह आहेत. स्थानिक पातळीवर कृषी विभागाकडे त्यांचे संकलन करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद गरजेचा आहे. गृहभेटी दरम्यान वस्तुनिष्ट व खरी माहिती देवून आरोग्य प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी विनंती केली. तर जिल्हा परिषदेचे सभापती यतीन पगार यांनी मनोगत व्यक्त करतांना लखमापुरातील विकासकामांना न्याय दिल्याने आभार व्यक्त केले.

लोकार्पण करण्यात आलेली कामे

कारगिल वस्ती सभामंडप, डोंगऱ्यादेव सभामंडप, जैतोबा मंदीर सभामंडप, गणपती मंदीर चौकाचे सुशोभीकरण, वार्ड क्रं. 4 व 5 मधील काँक्रिटीकरण, अंगणवाडी कंपाऊंड इंदिरानगर, नंदीवाडी, भूमिगत गटार, ओपन प्लेस कंपाऊंड करणे, दशक्रिया विधी शेड, निंबोळा रोड, धांद्री रोड व रामवाडी रोड, पथदिप शिवाजी चौक, मालेगाव रोड, होळी चौक, भामरे चौक

भूमिपूजन करण्यात आलेली कामे

मंगलकार्यालय भूमिपूजन, वार्ड क्रं 5 व 6 येथे नवीन रस्ते करणे, रस्ते काँक्रिटीकरण करणे, हायमास्ट व पथदीप बसविणे (शाहू चौक, नंदीवाडी, दत्त नगर), व्यायामशाळा बांधणे, वार्ड क्रं 2 रस्ता काँक्रिटीकरण, वार्ड क्रं 3 व 5 भूमिगत गटार करणे, शाहू नगर सुशोभिकरण करणे.

महत्वाच्या बातम्या –