‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमाला सर्व यंत्रणांचे सहकार्य आवश्यक – बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

अकोला – शासनाने राज्यातील पिकांच्या नोंदींसाठी ई-पीक पाहणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व पिकांची सद्यस्थिती आणि आकडेवारी एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे. तसेच या पाहणीमुळे पिकनिहाय उत्पादनाचा अचूक अंदाज, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देण्यात येणारी मदत, नुकसान भरपाई, तसेच विविध योजनांचे अनुदान देण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ई- पीक पहणी महसूल आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे व गतीने राबवावी, अन्य विभागांनीही या मोहिमेत सहकार्य करणे आवश्यक आहे, असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यंत्रणेस दिले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ना.थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता  डॉ. मिनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाची सद्यस्थिती, पीक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान भरपाई, गौण खनिज, संगणकीकृत सातबारा, ई-पीक पाहणी,वाळूघाट, मिळकत पत्रिका इ.बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी ना. थोरात म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही, ही लाट ऑक्टोबरपर्यंत येण्याचा इशारा आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या कालावधीसाठी आरोग्य यंत्रणांनी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करुन ठेवावे. त्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर द्यावा,असे निर्देश त्यांनी दिले. सद्यस्थितीत दुसरा डोस प्राधान्याने दिला जावा, सोबतच लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. येत्या काळात डेल्टा या कोरोनाच्या प्रकाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी कोरोना संपूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत काळजी घ्यावी,असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत लवकरात लवकर पोहोचवावी. तसेच जिल्ह्यातील पुरस्थिती हाताळतांना धरणातील पाणीसाठ्याचे नियमन करणे आवश्यक आहे,असे निर्देशही त्यांनी दिले. वाळूबाबत पर्यावरणविषयक मान्यता आणि जनसुनावणी वेळेत होण्याबाबत कार्यवाही करून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. कृषक जमिनींना अकृषक परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतीमान करण्यात यावी. कोणत्याही परवानग्या देतांना नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश ना. थोरात यांनी दिले.

बालकांसाठी बेड्स राखीव ठेवा-ना. यशोमती ठाकूर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी करतांना लहान बालकांसाठी बेड्स ची संख्या राखीव ठेवणे, तसेच कोविड बाबत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात यावे, अशी सूचनाही  श्रीमती ठाकूर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या –