‘हा’ कारखाना शेतकऱ्यांची चार कोटींची देणी ३० ऑक्टोंबरपर्यंत देणार

साखर कारखाना

अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी कारखाना उभारताना कारखान्याचे संस्थापक स्व.कुंडलिकराव जगताप यांनी केलेला संघर्ष कोणीही विसरणार नाही. कारखान्याकडे जवळपास ५३ कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे. त्यामुळे कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी कारखाना मागील वर्षाचे राहिलेले शेतकऱ्यांच्या उसाचे प्रति टन ५०० रुपयांप्रमाणे पेमेंट येत्या ३० ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून चालू गळीत हंगामातील उसाला जास्तीत जास्त बाजार भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी केले आहे. काल कारखान्याचा १७ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याप्रसंगी मा.आ.राहुल जगताप बोलत होते.

जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याकडे दोन वर्षापासून जवळपास ५३ कोटींची साखर शिल्लक आहे. कारखान्यासमोर अनेक अडचणी आहेत परंतु त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारखान्याकडे शेतकऱ्यांची जवळपास चार कोटींची देणी आहेत. ह्या महिनाअखेर पर्यंत शेतकऱ्यांची सर्व देणी देणार असून चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपी पेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जगताप म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी असलेले बाबासाहेब भोस म्हणाले की, कारखान्याच्या मागील गळीत हंगामातील साखरेला उठाव नसल्याने सुमारे ५३ कोटींची साखर गोडाऊनमध्ये शिल्लक आहे. शेतकऱ्यांचे मागील गळीत हंगामाचे ५०० रुपये प्रति टन प्रमाणे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. तेही येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात अदा केले जाईल.

यावेळी मा.आ.राहुल जगताप, बाबासाहेब भोस, साखर संघाचे संचालक घनश्याम आण्णा शेलार, अनिल वीर, हरिदास शिर्के, दीपक भोसले, सभापती गीतांजली पाडळे, मनोहर पोटे, अतुल लोखंडे, संजय महांडुळे आदींसह कारखान्याचे संचालक तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –