कर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत; शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत 54 लाख 72 हजार 311 अर्ज निकाली काढले असून त्यापैकी 46 लाख 35 हजार 648 खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी 30 लाख कर्जमाफीची खाती व 16 लाख खाती प्रोत्साहन योजनेतील आहेत. आतापर्यंत 13 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. एकूण 67 लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 लाख अर्ज तालुका स्तरिय समितीकडे पडताळणीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. एक रकमी परतफेड योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बँकांच्या माध्यमातून केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

ही योजना अत्यंत पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येत आहे. समितीने संपूर्ण डेटा संकलित केला आहे. ओव्हरड्यूव्ह असलेली सुमारे एक लाख खाती क्लिअर करण्यात येत आहेत. काही कारणास्तव अर्ज भरू न शकलेल्या शेतकऱ्यांनी 1 ते 31 मार्च या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.