‘या’ धरणग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी

मुंबई – मौजे पाडोळे येथील धरणाच्या कॅनॉलसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत, अशा धरणग्रस्त शेतकऱ्यांना एका महिन्यात नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानभवन येथे पाडोळे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत  ठाणे जिल्ह्यातील मौजे पाडोळे येथील धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणेबाबत विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव लोकेश चंद्र, उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील, उपसचिव पूर्णिमा देसाई, कार्यकारी अभियंता स.गो.गाढे, अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते चेतनसिंह पवार आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले म्हणाले, ठाणे जिल्ह्यात उल्हास खोऱ्यातील भामखोरी नदीवर लघु पाटबंधारे विभागाने धरण बांधले. आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून नंतर धरण बांधण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, धरण बांधून अनेक वर्षानंतरही संबंधित धरणग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने परतावा देण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कॅनॉलमध्ये गेल्या आहेत, पण यादीत त्यांचे नाव नसल्यास त्यासंदर्भातही सकारात्मक कारवाई करून नुकसानभरपाई देण्यात यावी. कृषी व वन विभागाशी समन्वय साधून तोडण्यात आलेल्या वृक्षांचे मूल्यांकन करावे, असे निर्देशही विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महत्वाच्या बातम्या –