ऊस वाहतुकदारांची फसवणूक, शेतकरी संघटना आंदोलन करणार

सांगली  : सांगली जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रूपयांची उचल घेऊन धुळे व बीड जिल्ह्यातील तोडणी मजूर व मुकादम यांनी पलायन केले आहे. याबाबत पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर तातडीने कारवाई न केल्यास शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्य प्रचारप्रमुख संजय कोले यांनी दिला.

धुळे व बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी करणा-या मजुरांच्या टोळ्यांना सांगली जिल्ह्यातील काही ट्रॅक्टर मालकांनी लाखो रूपयांची उचल दिली आहे. पण चालू हंगामासाठी या टोळ्या ऊस तोडणीसाठी आल्याच नाहीत. त्यामुळे ऊस वाहतुकदारांची मोठी अडचण झाली आहे. संबंधितांशी संपर्कही होत नसल्यामुळे काही ट्रॅक्टर मालकांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोंडाई गावातील टोळीतील काही जणांकडे चौकशी केली. मात्र संबंधितांनी या ट्रॅक्टर मालकांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याशिवाय त्यांच्याकडील भ्रमणध्वनी व नऊ लाख रूपयांची रोकडही काढून घेण्यात आली. याबाबत या ट्रॅक्टर मालकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित पोलीस अधिका-यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे धास्तावलेल्या या ट्रॅक्टर मालकांनी सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे- पालवे यांच्याकडेही दाद मागणार आहे.

त्यात ऊस वाहतुकदारांची फसवणूक करणारे मुकादम व मजूर यांच्यावर फौजदारी दाखल करावी, त्यांच्याकडून उचल घेतलेली रक्कम वसूल करावी, साखर कारखानदारांनी ट्रॅक्टर मालकांना वसुलीसाठी हप्ते बांधून द्यावेत, त्यावर व्याजाची आकारणी करू नये, मुकादम अथवा टोळ्यांशी करार करावेत, त्यांची स्थावर मालमत्ता तारण घ्यावी व तिसरा घटक म्हणून संबंधित साखर कारखान्याने या करारात सहभागी व्हावे व त्यांनीही ही जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे संजय कोले यांनी सांगितले.