चांगली बातमी – राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट

ओमायक्रॉन

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कोरोना रुग्ण घटण्याच्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे.

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसत आहे. पण कोरोना मृत्यूचा आकडा हा कालच्या तुलनेत आज वाढला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८५ हजार ३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ८३ हजार २५३ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५ टक्के एवढा आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद महाराष्ट्रात करण्यात येत होती. दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम सध्या दिसून येत आहे. परंतु राज्यावरील कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.