चांगली बातमी – राज्याला दररोज मिळणार ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन

चांगली बातमी - राज्याला दररोज मिळणार ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन

नागपूर : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची साद घातली असून केंद्राने देखील मदतीचा हात दिला आहे. मात्र, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. अशातच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे.

नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन पुरवठा होणार असून याचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी भिलाईमधून ६० टन द्रव्य प्राणवायू असलेले टँकर मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दररोज १५७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. प्राणवायूची मागणी बघता शहरातील ५० खाटापेक्षा जास्त असलेल्या रुग्णालयांनी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –