अकोला – राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पुरोगामी विचारांचं सरकार आहे. कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. या राज्यातील दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी हे शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रमही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबतही शासन लवकरच निर्णय घेऊ,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११९ दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक फिरते तीन चाकी विक्री क्रेंद्र वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फिरते विक्री केंद्राच्या चावीचे प्रतिकात्मक वितरण करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा नियोजन समिती मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणुन राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मिळून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या सदस्य असलेल्या महिलांना वा त्यांच्या कुटुंबातील दिव्यांग सदस्यांपैकी ११९ जणांना ही बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल तथा फिरते विक्री केंद्र वितरीत करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात मंगला सुरेश बुंदेले व अब्दुल रशीद या दिव्यांगांना ही चावी देण्यात आली. या उपक्रमासंदर्भात माविमंच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी माहिती दिली. तसेच एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी डी.एम पुंड यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षण या उपक्रमाविषयी माहिती सांगून त्याचे एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. तसेच दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त युडीआयडी कार्ड अर्थात दिव्यांगत्व ओळखपत्र बद्रुद्दीन अहमद व संजना बोरकर या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
- देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद
- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता
- राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
- पुढील २ ते ३ तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…