राज्यपालांना वेळ भेटेना, कांदा निर्यात बंदीने शेतकरी अडचणीत

राज्यपाल

पंढरपूर : केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र सिनेकलावंत, राजकीय नेत्यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांनी दखलही घेतली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या युवा शेतकऱ्यांना वेळ देत त्यांचे मत एकूण घेतले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुले असणारे बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर, पंकज चिवटे व निखिल सातपुते यांनी आज पंढरपूर येथे खा शरद पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या, यावेळी पवार यांनी सविस्तरपणे एकूण घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी, नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. साहेबांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले असल्याचं विरेश आंधळकर यांनी सांगितले.

विरेश आंधळकरचे राज्यपालांना पाठवलेले पत्र

मा. श्री भगतसिंह कोश्यारी

महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य

विषय – केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या कांदा निर्यात बंदी संदर्भात तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या इतर समस्यां संदर्भात आपणास भेटणे बाबत

महोदय

मी विरेश आंधळकर, रा – सौंदरे, ता – बार्शी, जि – सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.

बेभरवशाचं नैसर्गिक हवामान आणि यामध्ये शेतात काही पिकलं तरी बाजारामध्ये होणारी आमच्या शेतमालाची साठमारी पाहता आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले शिकवून शहरामध्ये नौकरीसाठी पाठवले, शेती करण्याची इच्छा असतानाही आम्हाला शहरात काम करावं लागतं. परंतु वैश्विक महामारीमुळे आता गावी परतावे लागले. त्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केल आहे. यंदा निसर्गाने देखील साथ दिलीय मात्र त्यातच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आलेला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले 3 ते 4 हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लादली त्यामुळे कांदा भाव गडगडणार यात शंका नाही.

उत्पादन खर्च एकरी 35 – 40 हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. शेतीमध्ये विजेच्या वेळा रात्री अपरात्री असतात त्यामुळे जीवावर उदार होऊन अंधारामध्ये पिकांना पाणी द्यावे लागते, रोगांमुळे हजारोंची औषधे फवारणी खत टाकावी लागतात, अशामध्ये शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. हीच परिस्थिती राहणार असेल तर कष्टकरी शेतकऱ्यांची पोर बंडखोर बनल्यास त्याला जबाबदार शासकीय यंत्रणा आणि राजकर्ते असणार आहेत.

आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपणच आता आधार होऊ शकता. तरी वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा ही हात जोडून विनंती

कळावे
आपल्या राज्यातील एक शेतकरी पुत्र

विरेश आंधळकर