महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, मात्र तो फक्त तोंड देखला आहे

प्रकाश आंबेडकर

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर, महाराष्ट्र सरकारने देखील शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘महाराष्ट्र् सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही? अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं? अस सांगितलं जातं. दोन दिवसांच्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कायदा तयार केला नाही’ अशी टीका त्यांनी केली आहे.

मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता’

राज्यमंत्री बच्चू कडू कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काही शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीने दिल्ली सीमेवर दाखल झाले होते. नुकतंच ते पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. दरम्यान, त्यांच्या दिल्लीतील आंदोलनातील सहभागावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. ‘मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता,’ असा प्रहार आंबेडकरांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –