मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी लावले पिटाळुन

पैठण/किरण काळे : सध्या विरोधीपाक्षांकडून सरकारवर हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो.हा आरोप खराच आहे की काय असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण पैठण तालुक्यात होऊ घातलेल्या बिडकीन येथिल आँरीक – बिडकीन या औद्योगिक क्षेञाचा भुमिपुजन सोहळ्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातुन आलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी पिटाळुन लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं ?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२१ एप्रील २०१८ शनिवार रोजी आँरीक – बिडकीन या औद्योगिक क्षेञाचा भुमिपुजन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . हा कार्यक्रम थाटामाटात करण्याचे ठरविले होते.त्यासाठी भव्य दिव्य व्यासपिठ व मोठा मंडप देखील उभारण्यात आला होता.कार्यक्रमासाठी गर्दी व्हावी म्हणुन शेतकऱ्यांसह अनेकांना निमंञन पञिका देण्यात आल्या होत्या.त्यामुळे खेड्यापाड्यातुन व ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी देण्यात आल्या असे शेतकरी मुंख्यमंञी आपल्या फायद्याचे काय सांगतील हे ऐकण्यासाठी मोठ्या आशेने याठिकाणी उपस्थित होते.

मात्र निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलावलेल्या बळीराजाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ऐनवेळी नियोजनात बदल करून मोजक्याच लोकांना व भाजप कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला.यासाठी कार्यक्रमस्थळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त ठेऊन मोजक्याच कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने मोठ्या आशेने आलेल्या शेतकऱ्यांना अपमानित होऊन परतावे लागले.