‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी; आता लवकरच ‘हे’ नियम लागू होणार

बंद

पुणे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. एप्रिल महिन्यात पुण्यात पाच ते सहा हजारांहून अधिक रुग्णांची संख्या नोंदवली जात होती. मात्र, कडक निर्बंधांमुळे ही संख्या आता १ हजाराच्या आत आली असून पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे आता पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या शहरांमध्ये (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

१० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असल्यास कोणते नियम ?

ज्या पालिका (१० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका) किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.

दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.

आता सामान्य पुणेकरांसह दुकानदार, व्यापाऱ्यांचे लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागले आहे. पुणे महापालिकेने सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या –