कोकण किनाऱ्यावर भरती-ओहोटी वाढण्याची शक्यता; समुद्र किनारे बंद ठेवण्याच्या सूचना

अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून दि. 12 व 13 जून रोजी या भागातील समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी होणार असल्यामुळे कोकण किनारा जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटक व स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली आहे.

वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भरती-आहोटी होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसासाठी बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 48 तासात मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्यात आहेत, असेही कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.