देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे १५० जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता

बंद

नवी दिल्ली – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित होत आहेत. औषधं आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इतकच काय तर स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे.

देशात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवनवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 379,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3645 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 2,69,507 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 360,960 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

देशात 18 ते 25 एप्रिल या काळात 22 लाख 49 हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या 28 लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे 16 हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही 1.13 टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 82,6 टक्के आहे.

दरम्यान, देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाउन सुरू असल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अधिक प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमध्ये मर्यादित सवलतींसह निर्बंध लागू करण्याचा विचार केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पंधरा टक्क्यांहून अधिक आहे, अशा १५० जिल्ह्यांत कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकीत बाधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन प्रस्तावित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याची सूचना केली आहे. परंतु कोरोना मृतांचे प्रमाण मोठे असल्याने आवश्‍यक सेवांना सूट देऊन लॉकडाउनचा विचार केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भ्रमातून बाहेर पडा, कोरोनाविरोधी लढ्याला बळकटी द्या, असे ट्विट केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत हा विचार झाला तरी हर्षवर्धन यांचे ट्विट पाहता आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कधीही सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, तमिळनाडूसह आठ राज्यांतील कोरोनाचे रुग्ण हे एकूण रुग्णसंख्येच्या ६९ टक्के आहेत. कोरोना संक्रमणाचा दर पंधरा टक्क्यांहून असलेल्या विविध राज्यांतील दीडशे जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात आधीच लॉकडाउन आहे. यांसह कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत असल्याने संक्रमणाचा दर कमी होऊ लागला आहे. म्हणून महाराष्ट्राचे मॉडेल अन्य राज्यांत वापरले जाऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या –