शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सध्याचं सरकार करु शकत नाही, कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही – राणे

नारायण राणे

मुंबई – शिवसेना आणि राणे बाप-लेकांचे वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांनी कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. शिवसेनेने राणे यांना गमावून आयता शत्रू निर्माण केला असल्याचे चित्र कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राने पाहिले आहे.

राणे पिता-पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. नारायण राणे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले तरीही राणे यांच्या टीकेपासून शिवसेना बचाव करू शकली नव्हती. भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी संसार थाटल्यापासून राणे अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीतच नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही’ अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

‘सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

‘नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. भाजपाला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु आहे’ असा आरोप करत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या आगामी आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या –