राज्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या वाढली

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राला काहीसा आशेचा किरण दिसलेला आहे. आज मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४८ हजार ४०१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज तब्बल ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ८६.४ टक्के इतकं झालं आहे. यात मुंबईनं लक्षवेधी कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात आज ५७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे.

दरम्यान, राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असे विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –