कोविडच्या आगामी लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी – डॉ.राजेंद्र शिंगणे

डॉ.राजेंद्र शिंगणे

लसीकरणासाठी पायाभूत सुविधा अद्ययावत कराव्यात

बुलडाणा – पुढील काळात कोविड-19 या साथरोगावर लस येण्याची शक्यता आहे. कोविडची लसीकरण मोहीम ही आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमांमधील सर्वात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेसह अन्य संबधित यंत्रणांनी आपली सज्जता ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी काल दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अपर पोलीस अधीक्षक श्री.बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

या मोहिमेसाठी पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, लसीकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लसीकरण मोहिमेत निवडणुकीच्या धर्तीवर काम करावे लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळही लागणार आहे. तरी मनुष्यबळाची उपलब्धता असावी. आतापासून त्याची तयारी करावी. तसेच लस साठवणुकीसाठी शित साखळी प्रभावी असावी.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय किंवा जिथे लसीकरण करण्यात येणार आहे, अशा ठिकाणी शित करणाची व्यवस्था असावी. त्यासाठी आवश्यक असलेली खरेदीची प्रक्रिया राबविण्यात यावी.  या कामात दिरंगाई होणार नाही, याची काळजी घ्यावी. लसीकरण करतेवेळी नियमानुसार तीन बुथची व्यवस्था असावी. तसेच लसीकरण झाल्यानंतर काही ॲलर्जी, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास निरीक्षण कक्ष असावे.

ते पुढे म्हणाले, लसीकरण मोहिमेत नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवावेत. प्रधान्यक्रमानुसार कुणीही लसीपासून वंचित राहता कामा नये.  लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून प्रशिक्षीत मनुष्यबळ असावे. लसीकरण मोहिमेत काही साईड इफेक्ट झाल्यास त्यासाठी किट असते. या किटमध्ये औषधे असल्याची खात्री करून घ्यावी. लसीच्या सर्व बाबींचा अभ्यास करून आरोग्य यंत्रणेने तयार रहावे.

मोहिमेदरम्यान एका दिवसाला 8000 नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आहे. लसीकरणाकरीता यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवण्यात करण्यात येत आहे. तसेच लस आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून आठ दिवसात लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी प्रयोगशाळा चाचणी अहवाल, माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान आदींचाही आढावा घेतला. बैठकीला संबंधीत यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –