केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे ‘या’ शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार

शेतकरी

अहमदनगर – केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा फायदा आदिवासी शेतकरी घेत आहेत. विकेल ते पिकेल या धोरणानुसार या भागातील शेतकऱ्यांनी जांभळा भात पिकवित आहेत. स्वतः आदिवासी शेतकरी विविध प्रदर्शनात तांदूळ विकत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे आदिवाशी शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे.

वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील शिरपुंजे, धामणवन या भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतीशाळामध्ये ‘भात नर्सरी लागवड ते काढणी पश्चात विक्री व्यवस्था’ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

पुढे वैभव पिचड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. तसेच जांभळा भात पिकविल्याने या भागातील शेतकरी शेठ झाले आहेत. जांभळ्या भातातील औषधी गुणधर्माचा उपयोग आजारी माणसांना होईल, या भातामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व आपला शेतीमाल स्वतः विकून फायदा मिळवावा, असे आवाहन पिचड यांनी केले.

दरम्यान, आदिवासी भागात पिकविलेला हा भात महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, तालुका कृषीअधिकारी प्रवीण गोसावी, प्रगतशील शेतकरी गंगाराम धिंदळे, शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –