पालच्या छावणीचा सातशे जनावरांना आधार !

  • शासन अनुदानित छावणीत पशुपालकांचे समाधान
  • सिद्धेश्वर कृषी व ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम

औरंगाबाद, दि.17 (जिमाका) :  अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ आहे. दुष्काळ निवारणासाठी शासन, प्रशासनाकडून  सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून फुलंब्री तालुक्यातल्या पालच्या शासकीय अनुदानित चारा छावणीत आज जवळपास 700 लहान-मोठी जनावरे दावणीला बांधलेली आहेत. त्यांना मुबलक प्रमाणात पाणी, ओला, सुका चारा, सुग्रास या ठिकाणी मिळत असल्याचे पशुपालक सांगतात.

फुलंब्री तालुक्यातील पाल येथे सिद्धेश्वर कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने शासकीय अनुदानित चारा छावणी उभारण्यात आली आहे. या छावणीत लहान 43, मोठे 652 जनावरे दाखल आहेत. या जनावरांना शासनाच्या सहकार्यातून आणि शासन नियमाप्रमाणे खाद्यान्न वेळेवर देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. जवळची रक्कम गुंतवून संवेदनशीलतेतून छावणी सुरू करण्यात आलेली आहे. पाल गावच्या परिसरातील जवळपास सहा गावातील जनावरे याठिकाणी दाखल झालेली आहेत. संस्थेमार्फत 2013 साली देखील चारा छावणी सुरू करून पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता, असे संस्थेचे सचिव रामदास जाधव सांगतात.

गावात पाणी नाही, अपुऱ्या पावसाने पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे जनावरांना चाराही नाही. अशा परिस्थितीत शासन अनुदानित असलेल्या या छावणीत मागील एक महिन्यांपासून छावणीत दाखल जनावरांना चारा, पाणी मिळतो आहे. पशुखाद्यही मिळते आहे. माझ्याकडील चार जनावरे याठिकाणी मी दावणीला बांधून ठेवली आहेत. त्यामुळे त्यांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मिटल्याचे तरुण पशुपालक संतोष शिंदे म्हणाले. तर मंदा जाधव, बाळासाहेब जाधव या दाम्पत्यांनीही त्यांची जनावरे याठिकाणी आणली आहेत. दुष्काळामुळे पाण्याच प्रश्न गंभीर झाला आहे. सध्याची परिस्थिती बिकट आहे. या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पालच्या छावणीमुळे दिलासा मिळाला आहे. आमच्या जनावरांना वेळेवर चारा, पाणी याठिकाणी मिळते आहे. त्यामुळे पशुधन तर वाचलेच परंतु या बिकट परिस्थितीत छावणी भक्कम आधार देणारी ठरली, असल्याचेही जाधव दाम्पत्य यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक बाबुराव जाधव म्हणतात, शासनाने उभारलेली चारा छावणी शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे. जनावरांना आवश्यक तेवढे अन्न छावणीत उपलब्ध करून देण्यात येते. लहान जनावरांपासून मोठ्या जनावरांपर्यंत सर्व प्रकारचे जनावरे याठिकाणी खूप मेहनतीने, काळजीपूर्वक जोपासली जातात. कोणत्याही प्रकारची जनावरांना उणीव याठिकाणी भासू दिली जात नाही.

मासे साठविण्यासाठी १० हजार शीतपेट्या उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाल येथीलच 50 वर्षीय हौसाबाई पुंडलिक जाधव यांची घरची परिस्थिती नाजूक असल्याने या दुष्काळात जनावरे जगवणे त्यांना कष्टदायी वाटत होते, मात्र या छावणीमुळे या प्रसंगालाही त्यांना सहज सामोरे जाता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर एकूण पाच जनावरांचे मालक असलेले मारोती जाधव यांनी जनावरे जगविणे शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. मात्र, या चारा छावणीत मोठ्याप्रमाणात जनावरांची निगा राखल्या जाते. त्यामुळे जनावरेही वेळेवर दूध देतात. या छावणीतील उपाययोजनांमुळे दुष्काळ जाणवत नसल्याचेही श्री. जाधव आत्मविश्वासाने सांगतात.पाल गावात पाणी अपुरे पडत असल्याने वाढीव टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. मात्र, या चारा छावणीत चारा, पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याचे छावणीतील पशुपालकांनी सांगितले.