मुख्यमंत्र्यामध्ये अजिबात दम नाही; धनंजय मुंडे

नांदेड : भाजप सरकार फक्त घोषणा करत मात्र अंमलबजावणी तर होतच नाही. असे म्हणत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकार वर हल्ला चढविला. राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाडयातून सुरु होणार आहे. नांदेड जिल्हयात लोहा, उमरी व माहूर अशा ३ ठिकाणी होणाऱ्या सभेच्या निमिताने मुंडे पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असून त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा  टप्पा मराठवाड्यातून निघणार आहे. सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त कारवाईची भाषा करतात. मात्र कारवाई करण्यास दम लागतो, तो दम त्यांच्यात नाही. दाखवितो, बघतो असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यामध्ये अजिबात दम नाही. हिवाळी अधिवेशनाच्या तोडांवर आंदोलनाचा पहिल्या टप्यात विदर्भातून हल्लाबोल आंदोलनास सुरुवात होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन रस्त्यावर उतरलो. त्यामुळे सरकारला काही निर्णय घेणे भाग पडले. तसेच मराठवाडयातील समस्यांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, वाढती महागाई, बेरोजगारी या मुद्दावर सरकारला धारेवर धरणार आहोत. हल्लाबोल यात्रेची सुरुवात १६ जानेवारीपासून तुळजापूर येथून होत आहे. दहा दिवसांच्या या यात्रेत दहा दिवसामध्ये दररोज ३ या प्रमाणे २८ सभांचे आयोजन करण्यात आले आहे.