आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.

जेऊर प्रतिनिधी :करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कारखान्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या च्या नेत्या रश्मी बागल यांची एकहाती सत्ता आहे .

आदिनाथचा इतिहास पाहिला तर १९७१ साली भूमीपूजन झाले होते, तब्बल २२ वर्षांनंतर पहिला गळीत हंगाम १९९२ साली झाला. ऐकेकाळी आदिनाथ कारखाना सोलापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जायचा परंतु  कालंतराने या कारखान्याचे वाईट दिवस आले.परिस्थिती इतकी वाईट आहे की जवळपास दीड वर्षांपासून गरीब कामगारांचे पगार नाहीत.

काही वर्षांपासून हा कारखाना मोठ्या अडचणीत असून कारखान्यात असलेल्या जवळजवळ ७०० कामगारांवर पगार न झाल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. पगार न झाल्याने तसेच रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.आदिनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या घरातील स्रीयांना नाविलाजाने उजनी पाणलोट क्षेत्रात असलेल्या वांगी, शेटफळ, चिखलठाण, भिवरवाडी, ढोकरी,कंदर आदी गावांमधील शेतात मजुरी ने कामाला जावे लागत आहे.

मागील दोन हंगाम वेगवेगळ्या कारणांमुळे चांगले गेले नव्हते मात्र यंदा पाऊस चांगला झाला असल्याने हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आहे . कर्मचारीवर्गाच्या पगारी लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे . आम्ही अतिशय संवेदनशील नजरेने या प्रश्नाकडे पाहत आहोत . मी स्वतः एक महिला असल्याने महिलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल याची पूर्ण कल्पना आहे .या कठीण काळात देखील कर्मचारी आमच्या सोबत असून नव्या जोमाने आम्ही या हंगामाला सामोरे जाणार आहोत तसेच कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आदिनाथच्या कर्मचारीवर्गाला दिवाळी बोनस येत्या सात तारखेपर्यंत देण्यात येणार आहे.-रश्मी बागल ,संचालिका आदिनाथ सहकारी साखर कारखाना