पेरणीसाठी भात, बी-बियाणे व कृषी निविष्ठांची कमतरता पडू नये

 पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश

अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका) : जिल्ह्यात पारंपरिक भात लागवड क्षेत्र आहेत परंतू हे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे आणि भाजीपाला क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. सध्याच्या करोना परिस्थितीमध्ये जिल्ह्याला बाहेरच्या जिल्ह्यातून भाजीपाला आणावा लागत आहे, त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये भाजीपाला क्षेत्र कमी आहे, त्या तालुक्यांमध्ये भाजीपाला क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा, कारण जे बाहेरून जिल्ह्यात लोक आलेले आहेत, ते यावर्षी बहुतेक शेतीवरच अवलंबून राहतील. त्या दृष्टीने बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा होण्याची आवश्यकता आहे, म्हणूनच पेरणीसाठी भात, इतर पिकांचे बी-बियाणे व कृषी निविष्ठांची  कमतरता पडणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित खरीप हंगाम पूर्व -2020 आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. ही बैठक जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार, प्रांताधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसिलदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत पार पडली.

या बैठकीस जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पाडूरंग शेळके, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, लिड बँक मॅनेजर आनंद निंबेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे श्री.वाड, आरसीएफ कंपनीचे संतोष काटकर आदी उपस्थित  होते.

पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या, दैनंदिन खत पुरवठा वेळेवर होईल, या दृष्टीने कार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचे अर्ज गावपातळीवर भरून घेण्याकरिता बँकांना कृषी विभाग व इतर यंत्रणा सहकार्य करतील. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर आणि जिल्हा रेड झोन मधून बाहेर पडल्यानंतर सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सूचित केल्यानुसार या विषयावर सविस्तर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी समक्ष बैठकही आयोजित करण्यात येईल. यावर्षी बियाण्यांची आवश्यकता जास्त असण्याची शक्यता असल्यामुळे आणि चाकरमानी शेतीकडे वळण्याची शक्यता असल्यामुळे वाढीव बियाणे पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग आवश्यक ती कार्यवाही करेल.

बैठकीच्या सुरुवातीला प्रथम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती आणि खरीप नियोजनाबाबत सादरीकरण केले.

खासदार सुनिल तटकरे यांनी आधारभूत किंमतीने भात खरेदी किती झालेली आहे आणि यापुढेही ही खरेदी करणार किंवा कसे, बियाणे पुरवठा शासनामार्फत पंचायत समिती स्तरावर होणार आहे का, तसेच शासनामार्फत मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे का? अशी विचारणा केली असता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले की, सध्या शासनामार्फत बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत नसून बियाणे विक्रेत्यांमार्फत करण्यात येतो.

तसेच खासदार श्री.तटकरे यांनी सूचित केले की, महाबीजमार्फत होणारा बियाणे पुरवठा योग्य दर्जाचा होईल, याची दक्षता घ्यावी तसेच ज्या भागात बियाणे पुरवठा होणार नाही त्या भागात शासनामार्फत बियाणे पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. खाजगी दुकानदारांमार्फत होणारी बियाणे विक्री योग्य दर्जाची होईल, याची दक्षता घ्यावी, पावसाळ्यापूर्वी पाणलोटाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावीत. आंबा उत्पादकांना करोनामुळे मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच त्यांना पोलिस यंत्रणेकडून सहकार्य होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.

पिक कर्ज अर्ज भरून घेण्याकरिता बँकांनी गावपातळीवर जाण्याची आवश्यकता आहे,  असे खासदार श्री.तटकरे यांनी सूचविल्यावर प्रबंधक अग्रणी बँक आनंद लिंबेकर यांनी सांगितले की, आम्ही गावपातळीवरून कर्ज प्रकरणे अर्ज भरून घेत आहोत तसेच त्याकरिता लागणारी स्टॅम्प ड्युटी भरण्याकरिता एक महिन्याची मुदत देण्याकरिता शासनाने सूचित केल्यानुसार आवश्यक ती कार्यवाहीदेखील करीत आहोत.

खासदार श्री.सुनिल तटकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी पाणलोटाची अशी राहिलेली अपूर्ण कामे करण्यासाठी यापूर्वीच निर्देश देण्यात आले  होते तथापि मजूर कामावर येण्यासाठी धजावत नसल्यामुळे अद्याप कामे सुरू झालेली नाहीत मात्र आपण या मजूरांना धीर देऊन ही कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसेच अशी किती अपूर्ण कामे आहेत याची माहिती संकलित करून ती तात्काळ सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येतील, असे सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की,  करोनामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आंब्याच्या विक्रीकरिता शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी पिक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना मदत करावी.

आमदार श्री. महेंद्र दळवी यांनी सूचित केले की, बियाणे खते देण्याबरोबरच पाणलोटाची अपूर्ण कामेही पूर्ण करण्यात यावीत. आमदार श्री बाळाराम पाटील यांनी सूचित केले की, करोनामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. खरीपाच्या तयारीकरिता शेतकऱ्यांना शासनामार्फत किंवा जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत बियाणे, खते, जमीन मशागत करण्याकरिता आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांना शेतावर जाण्याकरिता करोनामुळे अडचण येऊ नये. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व शेतीची कामे वेळेवर होण्यासाठी कार्यवाही होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

आमदार अनिकेत तटकरे यांनी सूचित केले की, जिल्ह्यात आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भाजीपाला, दुग्ध उत्पादन इत्यादी कृषी संलग्न व्यवसाय वाढविण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्व यंत्रणांनी कामकाज करावे.

जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले की, दुर्गम भागात बियाणे आणि खत पुरवठा वेळेवर होण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही कृषी विभागामार्फत निश्चितच करण्यात येईल. तसेच कर्ज प्रकरणांच्या बाबतीत ग्रामपातळीवरून कर्ज प्रकरणे करून घेण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी बँकांना आणि संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात येतील.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप हळदे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत स्तरावर कर्ज प्रकरणे स्वीकारल्यास त्याचा शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल.
Loading…