तीन नवे कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचं भविष्य पालटतील – प्रकाश जावडेकर

शेती आणि शेतकरी

नवी दिल्ली – नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. पंजाबमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त अधिक आहे. याच कायद्यांचा निषेध  नोंदवणाऱ्या  शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी पंजाबमध्ये दाखल झाले आणि आमचं सरकार येताच हे जाचक कृषी कायदे रद्द करू अशी घोषणा केली.

तर दुसऱ्या बाजूला तीन नवे कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचं भविष्य पालटतील असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं.  हे कायदे कृषी क्षेत्राला ग्रासून टाकणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करतील असा विश्वास जावडेकर यांनी काल पणजी इथं ‘शेतकऱ्यांचं सक्षमीकरण’ या विषयावरील वार्ताहर परिषदेत व्यक्त केला.

बरीच वर्षे वंचित राहिलेला शेतकरी आता आपल्या कृषीमालाचं मूल्य ठरवण्यास सक्षम होईल. स्वतःच्या शेतातील उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचा की खुल्या बाजारात हा पर्याय त्याला खुला राहील. शेतीमाल कोणत्या दराने विकायचा याचेही अधिकार शेतकऱ्याला मिळालेले आहेत असं ते म्हणाले. नवीन कृषी सुधारणा कायदे ‘एक राष्ट्र एक बाजारपेठ’ या शासनाच्या दूरदृष्टीच्या धोरणांशी सुसंगत आहेत असं सांगून जावडेकर म्हणाले की या कायद्यानुसार कंत्राटी शेतीतही मालकी शेतकऱ्याकडेच राहिल याची खात्री देण्यात आली आहे.

कित्येक वर्षे कमी उत्पादकता ह्या एकाच गंभीर समस्येनं शेतकऱ्यांना भेडसावलं होतं. आता नवीन बियाणे, आणि गुंतवणूक कृषी क्षेत्रात येईल. गुंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसंच नवीन बियाणांमुळे उत्पादकताही वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या –