कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या गावातील निर्बंध अधिक कडक करा – जयंत पाटील

जयंत पाटील

सांगली – तासगाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याने तासगाव तालुक्यात ज्या गावांमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या जास्त असेल त्या गावामध्ये निर्बंध अधिक कडक करा. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

तासगाव तहसिलदार कार्यालयात कोरोना सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पंचायत समिती सभापती कमलाताई पाटील, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे-भंडारे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी, गटविकास अधिकारी दिपा बापट आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, तासगाव शहर व ग्रामीण भागातील रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी नगरपालिकेने उभारलेले रूग्णालय तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी. या रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी. तासगाव तालुक्यामध्ये कोरोना टेस्टींग वाढविण्यावर भर देण्यात यावा. तालुक्याला व्हेंटीलेटरचा अधिक पुरवठा होईल याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शनची रोजची मागणी सुमारे 900 इतकी आहे. तरीही रेमडेसिवीरचा पुरवठा अपुरा होत आहे. प्राप्त होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे योग्य प्रकारे जिल्ह्यात वाटप करण्यात यावे. ज्या ठिकाणी रूग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात. तासगाव तालुक्यातील सर्व 69 गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु करता येवू शकेल का याबाबत सर्व स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, सर्व सरपंच यांची ऑनलाईन बैठक आयोजित करावी आणि जनता कर्फ्यु बाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जे कोरोनाबाबतचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारावा आणि निर्बंधांची अंमलबजावणी कडकपणे करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तासगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करून या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधांबाबत ज्या उणिवा असतील त्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या –