५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल

५० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल योगेश टिळेकर

पुणे : एकीकडे येवलेवाडी विकास आराखड्यात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमध्यये अडकलेल्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मतदार संघात फायबर ऑप्टीकलचे कामे करताना धमकी आणि त्रास देवुन दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी फोनव्दारे 50 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात रवींद्र लक्ष्मण बराटे (55, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम 385,379,427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिला. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे.

फिर्यादी कोण आहेत ?
फिर्यादी हे इ- व्हीजन टेलि. इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.