आज तरी भाजप मध्ये, उद्याच माहित नाही ; एकनाथ खडसे

रावेर: माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप ला घरचा आहेर दिला आहे. सध्या राज्यात शेतीची बिकट अवस्था असून सध्याच सरकार अन्य विषयांवर चर्चा करण्यात मग्न आहे. शेतीला प्राधान्य देऊन कृषी विकासाची चर्चा व्हायला हवी. मात्र ती होत नसून शासकीय पातळीवर शेतीक्षेत्र पूर्णपणे दुर्लक्षित ठरले आहे. तसेच आज तरी भाजप मध्ये आहे उद्याच माहित नाही, अस स्पष्ट केलं. रावेर येथील श्रमसाधना केळी प्रोड्यूसर कंपनीचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

खडसे म्हणाले, राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली राज्यात पणन व मार्केटिंग संस्था आहेत. मात्र त्या सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आमदारांच्या दबावाखाली असल्याने हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे स्वतंत्र, स्वायत्त निर्णय घेऊ शकले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. सध्या शेती व शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून , दलाल, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. शेतीमालाचा दर्जा, उत्पादन, तसेच बाजारपेठेत शेतीमालाला भाव मिळणे हे शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाही. शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाही. केळीला बाजारपेठ मिळाली पाहिजे. दलाली नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना संघटित करून हक्काची कंपनी निर्माण होणे गरजेचे आहे.