प्लास्टिक बंदीच्या विरोधात पुण्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन

पुणे : प्लास्टिक बंदीच्या विरोधात आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ पुण्यातील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. प्लस्टिक बंदीचे व्यापाऱ्यांनी स्वागत केले मात्र जाचक अटी रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. दंडाच्या नावाखाली 5000 हजार रुपये वसूल केले जात आहेत यामुळे वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची चंगळ होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास मंगळवारपासून (26 जून) व्यापारी बेमुदत बंद पुकारणार असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

शहरातील कोथरुड, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, सर्व पेठ भाग, गोखलेनगर, वडगावशेरी, चंदननगर आदी उपनगरातील व्यापारी संघटनांच्या रिटेल व्यापारी प्रतिनिधींची रविवारी बैठक झाली. यामध्ये सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.