पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात परिवहन विभाग घेणार पुढाकार – परिवहनमंत्री

परिवहनमंत्री

पुण्‍याच्‍या विभागीय आयुक्‍त कार्यालयात आलेली मदत पूरग्रस्‍तांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्‍यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्‍वयाची जबाबदारी सोपविण्‍यात आल्‍याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

विभागीय आयुक्‍त कार्यालयाला श्री.रावते यांनी भेट देऊन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांच्‍याकडून मदतीची माहिती घेतली. सांगली आणि कोल्‍हापूर येथील पूरग्रस्‍तांसाठी जमा झालेली मदत अधिकारी सांगतील त्‍या ठिकाणापर्यंत ट्रकमधून योग्‍य पध्‍दतीने पोहोचवण्‍यात येईल, असेही त्‍यांनी सांगितले.

श्री. रावते म्‍हणाले, पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाने पुढाकार घेऊन एनडीआरएफच्‍या जवानांना पुण्‍यातून पूरग्रस्‍त भागात घेऊन जाण्‍यासाठी 10 बसेस उपलब्‍ध करुन दिल्‍या होत्‍या. त्‍या आजही त्‍यांच्‍याकडेच आहेत. परिवहन खात्‍यामार्फत 41 ट्रकमधून मदत पाठविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली. एनडीआरएफकरिता 11 इनोव्‍हा गाड्या देण्‍यात आल्‍या. पूरग्रस्‍त भागातील बचाव आणि मदत कार्यासाठी आपत्ती विभाग रात्रंदिवस कार्यरत आहे. या विभागातील महिलांना उशिरापर्यंत काम करावे लागते, त्‍यांना घरी सुरक्षित सोडण्‍याची जबाबदारी परिवहन विभागाने घेतली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

कोल्‍हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थिती असतानाच सातारा जिल्‍ह्यात भैरवगड येथेही डोंगर खचल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. हे गाव खाली करण्‍यात आले असून गावकऱ्यांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. गावाकडे जाणारे रस्‍ते खचल्‍याने वाहतूक बंद झाली. या गावाचे पुनर्वसन करण्‍याची गरज असून सध्‍या त्‍यांना तातडीने तात्‍पुरता निवारा उपलब्‍ध करुन द्यावा लागणार आहे.

या गावाला साताऱ्याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे, त्‍यांचा अहवाल आयुक्‍तांकडे येईल, त्‍यानंतर पर्यायी जागा उपलब्‍ध करुन त्‍यांच्‍या पुनर्वसनाचा प्रयत्‍न करावा लागेल, असेही ते म्‍हणाले. भैरवगड येथील गावकऱ्यांसाठी महिला संघटनेमार्फत भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आल्याबद्दल त्‍यांनी याचे कौतुक केले.

महत्वाच्या बातम्या –

पूर परिस्थितीमुळे वन रक्षक भरती प्रक्रिया पुढे ढकलली, सुधारित तारखा नव्याने कळविणार – वन विभाग

महापुरामुळे सांगलीत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ; बाजारपेठ उध्वस्त

कोल्हापूर जिल्ह्यात ४ हजार १२० जनावरांचे तात्पुरत्या छावण्यांमध्ये स्थलांतर

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.