खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना मिळतोय दिलासा – दादाजी भुसे

दादाजी भुसे

मालेगाव – कोरोना संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून संपूर्ण राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहीले आहे. असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण तर्फे येथील कृष्णा लॉन्स, मोतीबाग नाका, संगमेश्वर मालेगाव येथे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवणचे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, विकास मीना, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, उपप्रादेशिक अधिकारी नाशिक तुषार मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी जे.एस.चौधरी, गृहपाल एन.सी.खैरनार, वरिष्ठ निरीक्षक एम.आर.देवरे, दीपक तलवारे, धोंडू अहिरे, रामदास सोनवणे, वाय.के.खैरनार, प्रकाश पवार माळी यांच्यासह तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.आदिवासी बांधव खावटीवर अवलंबून राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी शाश्वत रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावरुन विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, खावटी अनुदान योजनेतंर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपयाचे अनुदान डीबीटीव्दारे वर्ग करण्यात येत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात खावटी किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. या किटच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेण्याच्या सुचना देतांनाच आदिवासी बांधवाना खराब वस्तूंचे वाटप झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अजूनही पात्र लाभार्थ्यांची नोंदणी राहिली असल्यास त्यांनाही लाभ देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील जे कोणी आदिवासी बांधव काम धंद्यानिमित्त गुजरात किंवा इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले होते. त्यांच्याशी आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी संपर्क साधून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन त्यांना लाभ दिला असला तरी याव्यतिरीक्त कोणी लाभार्थी शिल्लक राहीले असतील त्यांनी जवळच्या आश्रमशाळेशी संपर्क साधून अर्ज भरुन घेण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर ज्या आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड नव्हते अशा सुमारे 750 लाभार्थ्यांना योजनेतंर्गत मोफत रेशनकार्ड देण्यात आले असून ज्यांना अजून रेशनकार्ड मिळाले नाहीत त्यांनी संबंधित कार्यालयात कागदपत्रे सादर करुन मोफत रेशनकार्ड बनवून घेण्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री.मीना यांनी प्रास्ताविकातून खावटी अनुदान योजनेची माहिती देतांना कळवण प्रकल्पातंर्गत एकूण 11 हजार 992 इतक्या नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यापैकी 10 हजार 99 इतक्या पात्र लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून 8 हजार 682 नागरिकांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली आहे. तर तालुक्यातील 150 गावातील एकूण पात्र 10 हजार 100 लाभार्थ्यांना आज मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या –