Type-2 Diabetes | टाईप-2 डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी करा रोज ‘ही’ योगासने

Type-2 Diabetes | टाईप-2 डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी करा रोज 'ही' योगासने

टीम महाराष्ट्र देशा: भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डायबिटीसचे दोन प्रकार आहेत. यामध्ये टाईप-1 (Type-1) डायबिटीज आणि टाईप-2 (Type-2) यांचा समावेश आहे. टाईप 1 डायबिटीजपेक्षा टाईप 2 डायबिटीस जास्त धोकादायक आहे असे मानले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, देशात 77 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि 2045 पर्यंत ही संख्या 134 दशलक्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत.

मात्र, अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर काही योगासने करून आपण डायबिटीसवर नियंत्रण ठेवू शकतो. कारण रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. काही योगासनांच्या मदतीने तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात. त्याचबरोबर ही योगासने केल्याने तुमचा टाईप-2 मधुमेहाचा धोका देखील कमी होऊ शकतो. टाईप-2 मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील योगासने करा.

मंडूकासन – Mandukasana

नियमितपणे मंडूकासन केल्याने टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. हे आसन करताना शरीराचा आकार बेडकासारखा होतो म्हणून याला मंडूकासन असे म्हणतात. हे आसन नियमित केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर हे आसन पॅनक्रिया सक्रिय करतात, त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढते. हे आसन करण्यासाठी तुम्हाला वज्रासनात बसावे लागेल. वज्रासनात व्यवस्थित बसल्यानंतर दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या लागतील. हाताच्या मुठी बंद करताना अंगठ्याला बोटाच्या आतल्या बाजूस दाबा. त्यानंतर दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवून श्वास सोडताना खाली वाका आणि हनुवटी जमिनीवर टिकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये थोडावेळ राहिल्यानंतर परत वज्रासनात या. हे आसन तुम्ही चार ते पाच वेळा करू शकतात.

सेतुबंधासन – Setubandhasana

सेतुबंधासन या आसनाला ब्रिज पोझ असे देखील म्हणतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक फायदेशीर योगासन ठरू शकते. या योगासनामुळे स्नायू तर मजबूत होतात पण त्याचबरोबर पोटावरची अतिरिक्त चरबी देखील कमी होते. हे आसन करण्यासाठी तुम्हाला पाठीवर जमिनीवर झोपावे लागेल. त्यानंतर तुम्हाला गुडघे वाकून तळवे जमिनीवर ठेवावे लागेल. त्यानंतर पाठीखाली दोन्ही हात घट्ट एकत्र पकडुन घ्या. त्यानंतर श्वास घेताना हळूहळू शरीरवर उचला. शरीरवर उचलल्यावर या पोजमध्ये तुम्ही एक ते दोन मिनिटे राहू शकतात. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत प्रारंभिक स्थितीत परत या.

पश्चिमोत्तानासन – Paschimottanasana

पश्चिमोत्तानासन हे आसन नियमित केल्याने मधुमेहासोबतच अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर हे आसन नियमित केल्याने पचनक्रिया देखील मजबूत होऊ शकते. या आसनाच्या सरावाने शरीरातील जलप्रवाह चांगला होऊन रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. हे आसन करण्यासाठी तुम्हाला सुखासनामध्ये बसावे लागेल. त्यानंतर दोन्ही पाय समोर सरळ उघडा आणि बसा. त्यानंतर श्वास सोडत पुढे वाकत हळूहळू दोन्ही हातांनी दोन्ही पायांची अंगठे धरण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करू शकता. कपाळाचा गुडघ्याला स्पर्श झाल्यानंतर तीस ते साठ सेकंद तुम्ही ही स्थिती होल्ड करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या