समर्पित निधी प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – सन  2021 – 22 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर अखेर 170 कोटी मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 9.18 टक्के खर्च झाला आहे तसेच अनुसुचित जाती उपयोजनेच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी  27.44 टक्के खर्च झाला आहे. समर्पित केलेला 44 कोटी 55 लक्ष निधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.

या बैठकीस केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,  नियोजन समितीचे सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सुरुवातीला स्वागत करुन विषय वाचन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही. संबंधित यंत्रणांनी 31 मार्चपर्यंत जिल्हा नियोजन मधील सर्व निधी खर्च करावा. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींना निधी वाटपामध्ये तसेच कामे सुचवताना समान न्याय दिला जाईल. सदस्य, आमदार, खासदार व निमंत्रित सदस्यांनी सुचविलेली कामे प्राधान्याने करण्यात येतील. सभागृहामध्ये नियोजन समितीशी संबधित विषयांवरच चर्चा करण्यात यावी. जिल्ह्याला सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी 170 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 9 पूर्णांक 18 टक्के निधी खर्च झाला आहे. खर्च झालेला एकूण निधी हा 15 पूर्णांक 61 कोटी रुपयांचा आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 14 पूर्णांक 78 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी 4 पुर्णांक 43 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 पूर्णांक 06 कोटी रुपये खर्च झाला असून त्याची टक्केवारी 27.44 इतकी आहे. अदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी 37 लक्ष रुपयांपैकी 11 लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे. कोविड मुळे यंदाच्या वर्षी निधी उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे येत्या 4 महिन्यांमध्ये संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी यंत्रणांवर आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. घाट रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. आराखड्यातील कामांची अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे केली जाईल.

केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, सर्वांनी विकास कामांसाठी एकत्र काम करावे. विकासासाठीचा निधी जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्यासाठी लोक प्रतिनिधींनी जनतेला हवी असलेली विकासकामे प्राधान्याने घ्यावीत. त्यासाठी पाठपुरावा करावा.

यावेळी सदस्यांनी कळणे खाण प्रकल्प, सिंधुदुर्गनगरी येथील मुला – मुलींचे वसतीगृह, वीज मिटरची जोडणी, कृषी पंपाची जोडणी, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, रुग्ण वाहिकांसाठीचे इंधन, देवघर कालवा, बल्क कुलरच्या निकषांमध्ये बदल या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

जिल्ह्यातील प्राचीन लोककला असलेली कळसुत्री बाहुल्यांचा खेळ ही कला जोपासणारे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या संस्थेस विशेष निधी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सुरुवातीस दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कोविडमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे आणि केंद्रीय मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल नारायण राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या –