पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त थापा मारता येतात-उद्धव ठाकरे

रविवारपासून मी शेतकरी आणि जनतेच्या भेटी घेतो आहे, परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारविरोधात वातावरण गरम झालं आहे ही उष्णता सरकारला कळली नाही तर सिंहासन जळून जाईल अशी बोचरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्या थापा मारत फिरत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. रोज कुठून तरी सांगत असतात की २०३० पर्यंत सर्वांना घरे मिळतील. म्हणजे तुम्हाला त्यांना मतं द्यावी लागणार. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडायचा आणि मतं मागायची एवढेच त्यांना जमते असे दिसते आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना घोषणांचा आणि आश्वासनांचा पाऊस सुरु आहे. गाजरांच्या शेतीसाठी मतांचा पाऊस पाडू नका असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. शिरुरमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आणि फडणवीस सरकारवर टीका केली.

आत्ताच्या आणि महात्मा फुले यांच्या काळातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काही फरक पडला आहे असे वाटते का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. गाजराच्या शेतीला मतांचा पाऊस टाकू नका असेही आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली. राष्ट्रवादीची मला काळजी वाटते आहे, आजूबाजूला दुष्काळ पडतो आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असं म्हणत अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली. राफेल कराराला नेमका विरोध आहे की पाठिंबा ते काकांना विचार असा टोलाही अजित पवारांना त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिकाही दुटप्पी आहे. भाषण करताना सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव घ्यायचं आणि राजधानीत न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करायचा असं त्यांचं धोरण आहे. पुन्हा मीच पंतप्रधान होणार मीच मुख्यमंत्री होणार असे दावे केले जात आहेत. आम्ही यांच्यासोबत पाच वर्षे कशी काढली आमचं आम्हाला ठाऊक असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.