‘पानी फाऊंडेशन’च्या उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

पाणी अडविणे आणि जिरविणे यासाठी ‘पानी फाऊंडेशन’ करीत असलेले काम राज्याच्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन आणि गावाचा सर्वांगिण विकासही गरजेचा असल्याने त्यासाठी शासनासोबत काम करीत असलेल्या पानी फाऊंडेशनला राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शेतकरी सर्वार्थाने समृद्ध व्हावा या उद्देशाने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या माध्यमातून पानी फाऊंडेशन सुरू करीत असलेल्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव, सत्यजित भटकळ आदींनी मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते.

यावर्षी हे काम राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून त्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आमिर खान यांनी दिली. त्यावर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात वाढविण्याची सूचना केली. ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याने या उपक्रमासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पाणी फाऊंडेशनला प्रशासनाचे नेहमीच सहकार्य मिळत असून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या उपक्रमास दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आमिर खान यांनी आभार व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या –

अपघातप्रवण क्षेत्रात ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री

आरे कारशेडच्या कामांना स्थगिती; आढाव्यानंतर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत सिंचन प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा आढावा घेणार – जयंत पाटील

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री