राम मंदिर उभारणीसाठी सरकारने कायदा करावा : मोहन भागवत

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागपूर येथे झालेला दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरावर भाष्य केले. राजकारणामुळे राम मंदिर उभारणीचा मुद्दा लांबणीवर पडला आहे, असे ते म्हणाले. राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने कायदा करायला हवा, असे सल्लाही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मोहन भागवत म्हणाले कि, राम मंदिर श्रद्धेचा मुद्दा आहे. राम जन्मभूमीवर मंदिर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. केवळ राजकारणामुळे राम मंदिराचा मुद्दा लांबला आहे. राम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा आणि मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहन त्यांनी केले. लोक म्हणतात, सत्ता तुमची तरीही राम मंदिर का होत नाही? परंतु सत्ता बदल्यानंतर मागण्या मान्य होतात हा केवळ भ्रम असल्याचे ते म्हणाले. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे नव्हतो आणि नसणार, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी यांचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, ज्यांचा साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी दोन हात केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते व महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झाले तरीही त्यांच्या कारवायांमध्ये जराही फरक पडलेला नाही. सुरक्षित तोच असतो जो शस्त्रात प्रबळ असतो. यासाठी सुरक्षेत आपण स्वावलंबी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मोहन भागवतांनी आपल्या भाषणात राम मंदिर, शबरीमाला मंदिर, शहरी नक्षलवाद, मतदान, सुरक्षितता या मुद्यांवर भाष्य केले.