इथेनॉलच्या खरेदी प्रक्रियेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – इथेनॉलच्या खरेदी प्रक्रियेला या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या आधी देशभरात इथेनॉलला एकच दर दिला जात होता; मात्र आता नव्या निर्णयामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेल्या इथेनॉलचा प्रतवारीनुसार वेगवेगळा दर असेल. साखरेपासून तयार केलेल्या इथेनॉलची किंमत 62 रूपये 65 पैसे प्रति लिटर असेल; कमी दर्जाच्या मळीपासून म्हणजेच बी-हेवी मोलॅसीस पासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत 57 रूपये 61 पैसे प्रती लिटर तर सी हेवी मोलॅसीस पासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत ४५ रुपये ६९ पैसे प्रति लिटर इतकी असेल.

देशातल्या धरणांची दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या दूसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थ विषयक समितीनं मंजुरी दिली असल्याचं शेखावत यांनी यावेळी सांगितलं. या अंतर्गत देशातल्या १९ राज्यातल्या 736 धरणांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या १६७ धरणांचा समावेश आहे.  एप्रिल 2021 ते मार्च 2031 या कालावधीत केल्या जाणाऱ्या या कामासाठी 10 हजार 211 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातला ८० टक्के खर्च जागतिक बँक आणि आशियाई इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक करणार आहे.

तागाच्या निर्मितीला आणि विक्रीला चालना देण्यासाठी यापुढे अन्नधान्याची १०० टक्के आणि साखरेच्या २० टक्के साठवणुकीसाठी तागाच्या पिशव्यांचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.भारत आणि जपान यांच्यामधील माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्य करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करणं तसंच भारत आणि कंबोडिया यांच्यातील आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबद्दलच्या सामंजस्य करारांनाही आज मंत्रीमंडळानं मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या –