शैक्षणिक सुधारणांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली – शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय कॅबिनेटने आज ‘स्टार्स’ प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पात महाराष्ट्रासह अन्य 5 राज्यांचा समावेश आहे.

स्ट्रेंगथनिंग टीचिंग-लर्निंग एंड रिजल्ट्स फॉर स्टेट्स (एसटीएआरएस) ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी 5,718 कोटी रूपयांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जागतिक बँकने 500 अमेरिकी डॉलर (कमाल 3,700 कोटी रूपये) मदत जाहीर केली आहे. या प्रकल्पाला आज कॅबिनेटने मंजुरी दिली.

स्टार्स प्रकल्प केंद्र प्रायोजित आहे. हा प्रकल्प केंद्रीय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाच्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, ‘पारख’ या स्वतंत्र आणि स्वायत्त संस्थेअंतर्गत राबविण्यात येणार आहे.

‘स्टार्स’ प्रकल्प 6 राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पा अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांना पाठींबा दिला जाईल. या प्रकल्पाबरोबरच गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड, झारखंड आणि आसाम राज्यांमध्ये शालेय शिक्षणाशी निगडीत प्रकल्प राबविण्यासाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आर्थिक सहाय्य करणार आहे. सर्व राज्ये एकमेकांसोबत अनुभव आणि उत्कृष्ट शिक्षण पद्धतींची देवाण-घेवाण  करतील.

स्टार्स प्रकल्पाचा उद्देश शिक्षणातील गुणवत्तापुर्ण, दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला मिळावे हा आहे. या प्रकल्पामध्ये राज्यातील निवडक शाळांमध्ये शालेय शिक्षण प्रणालीतील गुणदोषाचे विश्लेषण करून सुधारणा करण्यात येईल. आर्थिक बाबींशी निगडीत विषयांवरही विश्लेषणात्मक कार्य केले जाईल.

महत्वाच्या बातम्या –