अज्ञातांनी द्राक्षबाग केली उद्ध्वस्त, शेतकऱ्याचे 2 एकर द्राक्षबागेचे नुकसान

अज्ञातांनी द्राक्षबाग केली उद्ध्वस्त, शेतकऱ्याचे 2 एकर द्राक्षबागेचे नुकसान 10 k

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावामध्ये अज्ञात समाजकंटकांनी शांताराम विटे या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची दोन एकर द्राक्ष बाग कटरच्या साहय्याने कट करुन उध्वस्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विटे कुटुंबियांनी आपल्या शेतात चार एकर द्राक्ष लागवड केली होती. यातील दोन एकर बागेचे अज्ञात समाजकंठकांनी नुकसान केल्याने विटे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विटे यांनी आयडीबीआय बॅंकेकडुन जवळपास 25 लाख रुपये कर्ज घेऊन द्राक्ष शेतीची उभारणी केली होती. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञातांकडुन दोन एकर द्राक्षबागेची झाडे कट केल्याने विटे यांचे जवळपास 10 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपुर्वीही याच गावात अज्ञात समाजकंटकांनी पेरूच्या बागेचे नुकसान केले होते. त्यामुळे अशा समाजकंटकांना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत. या प्रकरणी आता नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध आता नारायणगाव पोलीस घेत आहेत.