मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका

पाऊस

औरंगाबाद – गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अवकाळीने मराठवाड्यातील नांदेड, जालना, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नांदेडमध्ये वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शिवाय जालना जिल्ह्यात दोन म्हशींचाही मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. लोहा तालुक्यातील सायाळ येथील शेतकरी तुकाराम मोरताटे (वय ४०) हे शेतात काम करत होते. यावेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरातील जलधारा, इस्लापूर, शिवणी, मांडवी तसेच कंधार तालुक्यातील फुलवळ परिसरात व हदगाव, देगलूर, लोहा तालुक्यातही पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात व शहरात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. औसा तालुक्यातील किल्लारी, आशिव परिसरातील द्राक्षबागांनाही या हवामान बदलाचा फटका बसला. उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा, फळबागा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. रेणापूर तालुक्यातील कारेपूर परिसरातही वादळी पाऊस आणि गारपिटीचा फळबागांना मोठा फटका बसला. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेरमुलकी पिंपळगावात दोन म्हशी दगावल्या. पुढील दोन दिवस धोका कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. ज्वारी, बाजरी,गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.

महत्वाच्या बातम्या –